सोमय्यांच्या मतदारसंघात मनसेचं आजही प्राबल्य, प्रचाराला बोलावणार: राष्ट्रवादी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई: भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात राज ठाकरे यांच्या मनसेचं आजही प्राबल्य आहे. त्यामुळे मनसे नेत्यांना प्रचाराला बोलवू, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी हे वक्तव्य केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. संजय दिना पाटील म्हणाले, “ईशान्य मुंबईत मनसेचं प्राबल्य आहे. त्यामुळे आमच्या […]

सोमय्यांच्या मतदारसंघात मनसेचं आजही प्राबल्य, प्रचाराला बोलावणार: राष्ट्रवादी
Follow us on

मुंबई: भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात राज ठाकरे यांच्या मनसेचं आजही प्राबल्य आहे. त्यामुळे मनसे नेत्यांना प्रचाराला बोलवू, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी हे वक्तव्य केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संजय दिना पाटील म्हणाले, “ईशान्य मुंबईत मनसेचं प्राबल्य आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांनी विनंती केली आहे की मनसेने या मतदारसंघात प्रचार करावा. त्यांचा नक्कीच फायदा होईल”

सोमय्यांना अपमानास्पद वागणूक

यावेळी संजय दिना पाटील यांनी विरोधी उमेदवार भाजप नेते किरीट सोमय्यांबाबतही भाष्य केलं. किरीट सोमय्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सोमय्या विरोधीपक्षात असले तरी असं व्हायला नको होतं. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जसं बाजूला केलं तसं तरी करायचं होतं”, असं संजय दिना म्हणाले.

सोमय्यांना शेवटपर्यंत रखडवून ठेवलं, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असं, संजय दिना पाटील म्हणाले.

ईशान्य मुंबईत सोमय्यांचं तिकीट कापलं

दरम्यान, भाजपने शिवसेनेच्या दबावानंतर किरीट सोमय्यांचं तिकीट कापून नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असताना, भाजपचा ईशान्य मुंबईतील उमेदवारच जाहीर झाला नव्हता. अखेर मनोज कोटक यांना उमेदवारी देत, भाजपने किरीट सोमय्यांना शांत केलं.

राज ठाकरे आघाडीचा प्रचार करणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी 9 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

ईशान्य मुंबईतील लढत

दरम्यान, मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्याने आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तर भारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून राष्ट्रवादीचे  संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे.


संबंधित बातम्या

राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मैदानात, ‘या’ 9 जणांसाठी सभा घेणार : सूत्र  

मनोज कोटक पहाटेपासून प्रचाराच्या रिंगणात, सेना नेते चार हात लांबच!   

तिकीट कापल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, मनोज कोटक डायनॅमिक!    

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना डच्चू, भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी!   

राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार, संजय दिना पाटलांना उमेदवारी