पैशाची कमी नाही, मानसिकतेची कमी, निर्णय घेण्याची हिम्मत हवी : नितीन गडकरी

| Updated on: Jan 20, 2020 | 11:42 AM

सरकारकडे पैशांची कमी नाही, तर काम करण्याच्या मानसिकतेत कमतरता आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं.  

पैशाची कमी नाही, मानसिकतेची कमी, निर्णय घेण्याची हिम्मत हवी : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर :  सरकारकडे पैशांची कमी नाही, तर काम करण्याच्या मानसिकतेत कमतरता आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं.  नागपूर शहर आणि मध्य भारतासाठी महत्वाची शैक्षणिक संस्था असलेल्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे उद्धाटन काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “खरं सांगायचं झालं तर  पैशाची काही कमी नाही. जी काही कमतरता आहे, ती सरकारमध्ये काम करण्याची मानसिकता आहे, त्यामध्ये आहे. नकारात्मक दृष्टीकोन, निगेटिव्ह अॅटिट्यूड आहे. निर्णय घेण्याची जी हिम्मत हवी, ती नाही. तेच त्याचं कारण आहे”

विकासकामांसाठी विविध योजनांवर पैसे खर्च करण्यात आपण मागे हटत नाही, असंही गडकरींनी नमूद केलं. “गेल्या 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे. यावर्षी 5 लाख कोटी रुपयांची कामं करण्याचं ध्येय आहे. मी आपल्याला खरं सांगू इच्छितो की पैशाची कमी नाही. जी काही कमतरता आहे, ती सरकारमध्ये काम करणाऱ्या मानसिकतेत आणि नकारात्मक दृष्टीकोणात होती. निर्णय घेण्यासाठी जी हिम्मत हवी, ती नाही”

नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला. “मागे मी एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या परिषदेत गेलो होतो. तिथे अधिकारी आम्ही हे सुरु करु, ते सुरु करु वगैरे म्हणत होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं तुम्ही का सुरु करणार? जर तुमच्याकडे काही सुरु करण्याची ताकद होती, तर तुम्ही आयएएस अधिकारी होऊन नोकरी का करता? तुम्ही जाऊन एखादा मोठा उद्योग करा, जो तुम्ही करु शकता. तुम्ही त्यांना मदत करा, या लफड्यात पडू नका” असं गडकरींनी सांगितलं.

दरम्यान ज्यांच्या नावाने विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ही प्रतिष्ठित संस्था उभारण्यात आली आहे, त्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरणही गडकरींच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या देशात अनेक गोष्टी बाहेरुन आयात कराव्या लागतात, त्यासाठी आपल्या देशात संशोधन व्हायला पाहिजे. ती क्षमता आपल्या देशातील लोकात नक्कीच आहे यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. या कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या ठिकाणी आहेत. त्यांच्या भरोशावर इथे कॉव्हेन्शन सेंटर निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सरकारवरच अवलंबून राहू नका. त्यांनी नाही केलं तर सरकारकडे या, सरकारची मदत घ्या, मी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असा सल्लासुद्धा गडकरी यांनी दिला.