मुंबई : संजय राऊत यांच्यावर (ED) ईडीने कारवाई केल्यानंतर आता विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्रीय संस्थांचा हस्तक्षेप हा वाढत आहे. ही एक चौकशीची प्रक्रिया असली तरी आतापर्यंत अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या असताना केवळ (Sanjay Raut) संजय राऊतांनाच का टार्गेट केलं जात आहे. असा सवाल (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तपास हा यंत्रणेचा भाग असला तरी यामध्ये राजकारण न आणता आणि सुड बुध्दीने कारवाई करु नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतर आता या केंद्रीय तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल मध्यरात्री संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांचे मेडिकल करुन पुन्हा कोर्टात हजर केले होते. मात्र, ही कारवाई सुडबुध्दीने केली जात असल्याचा सूर विरोधकांमधून उमटत आहे.
संजय राऊत यांची ईडी कडून चौकशी हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. ईडीची नोटीस केवळ त्यांनाच आली असे नाही. अनेकांना नोटिसा आलेल्या आहेत. यामध्ये आता भाजपात गेलेल्या नेत्यांनाही नोटिसा आहेत. मग त्यांच्यावर का कारवाई नाही असाच रोष अजित पवार यांचा होता. संजय राऊत हे त्यांच्या मतावर आणि पक्ष निष्ठेवर ठाम आहेत. असे म्हणून तर कारवाई होत असेल तर चुकीचे आहे. त्यामुळे नोटीस केवळ त्यांनाच असा भाग नाहीतर ज्यांना-ज्यांना नोटीस बजावण्यात आली त्यांचीही चौकशी होतेय का हे पाहणे महत्वाचे असल्याचे पवार म्हणाले आहेत.
राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर समाज माध्यमांमध्ये वेगळेच चित्र आहे. केंद्रीय संस्थांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आलेले दिवस जाणारच आहे. याचा किती गैरवापर करायचा हे ज्याने त्याने ठरवावे म्हणत अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोगच होत असल्याचे सांगितले आहे. शिवाय दिवस काय हेच कायम राहणार नाहीत. त्यामुळे भविष्यात वेगळे चित्र असेल असे म्हणत कारवाईमागे कोण हे आता नव्याने सांगायची गरज नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
आतापर्यंत अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या कुणाची चौकशी झाली तर कुणावर कारवाई. मात्र, हे होत असताना यंत्रणा ही केंद्राची असो की राज्याची त्यांनी सुडबुध्दीने चौकशी करु नये. कारण देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे. चौकशीमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल पण सुडबुध्दीने केलेली कारवाई आता समाज माध्यमापासूनही लपून राहत नसल्याचे पवारांनी सांगितले आहे.