भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

| Updated on: Nov 17, 2020 | 2:53 PM

बऱ्याच वर्षांपासून पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. | Ex union minister and MP Jaysingrao Gaikwad

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार
Follow us on

औरंगाबाद: भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला. (Ex union minister and MP Jaysingrao Gaikwad resign from BJP)

मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील स्वतंत्रपणे दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर आगपाखड केली.

बऱ्याच वर्षांपासून पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मला आमदारकी किंवा खासदारकी नको होती. मला केवळ पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे होते. जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मी नेतृत्त्वाकडे याबाबत मागणी करत होतो. अनेकवेळा वरिष्ठ नेत्यांना ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले, फोन केले. मात्र, तरीही पक्षाने आपल्याला संधी दिली नाही. सातत्याने होणाऱ्या या उपेक्षेला कंटाळूनच आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केले.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

कोण आहेत जयसिंगराव गायकवाड?
जयसिंगराव हे जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपच्या सोबत असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केंद्रात दोनवेळा राज्यमंत्रीपद भुषविले होते. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून दोनदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. दीर्घकाळ भाजपसोबत असल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांचे मराठवाड्यातील पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे.

जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द

माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री
माजी सहकार राज्यमंत्री
माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा)
माजी खासदार – बीड (तीन वेळा)

संबंधित बातम्या:

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा

मी सलग सहा वेळा निवडून आलो, प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून आमदार व्हावं, खडसेंचं प्रत्युत्तर

केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

(Ex union minister and MP Jaysingrao Gaikwad resign from BJP)