आता लाडकी बायको योजना… फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याचा टोला?

| Updated on: Jul 25, 2024 | 9:29 PM

येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात टोकाची कटकारस्थान होणार आहेत. वेगवेगळ्या योजनांद्वारे तुमच्यावरती प्रभाव टाकला जाईल. लाडकी भाऊ, बहीण योजनेप्रमाणेच आता लाडके काका, लाडकी काकू याबरोबर लाडकी बायको योजनादेखील आणा

आता लाडकी बायको योजना... फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याचा टोला?
devendra fadnavis (2)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या आरोपानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जेव्हा मेंदू काम करायचे थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा होते. अशी टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट केले होते. गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजे. त्यांना मोक्का लागावा यासाठी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला होता. गुन्हे दाखल करायला लावले. याचे पुरावे मी दिले होते. महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे हे प्रकार सुरु केले होते असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्यासमोर लागली. त्यामुळे एफआयआर दाखल झाला. ते जेलमध्ये गेले. ते सुटले नाही तर जामिनावर बाहेर आहेत. ते आरोप करत आहेत तरी मी शांत आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही. तसेच वेळ आली तर सर्व सार्वजनिक करेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्यावर टीका केली. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात टोकाची कटकारस्थान होणार आहेत. वेगवेगळ्या योजनांद्वारे तुमच्यावरती प्रभाव टाकला जाईल. लाडकी भाऊ, बहीण योजनेप्रमाणेच आता लाडके काका, लाडकी काकू याबरोबर लाडकी बायको योजनादेखील आणा अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. जेव्हा मेंदू काम कराचे थांबतो तेव्हा माणूस गुद्दागुद्दीवर येतो अशी टीकाही त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केली.