सिमरिया : हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात हनुमानाच्या जातीची चर्चा सुरु झाली. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असं मत अनेकांनी मांडलं. तर हनुमान दलित किंवा आदिवासी नसून तो जैन असल्याचा दावा राजस्थान येथील जैन आचार्य निर्भय सागर यांनी केला. यानंतर आता प्रसिद्ध प्रवचनकार मोरारी बापू यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. हनुमानाला दलित म्हणण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी हनुमानाला जातीच्या कचाट्यात फसवणाऱ्या योगी आदित्यनाथ आणि इतरांची निंदाही केली.
मंगळवारी ओरिसा येथील सिमरियात साहित्य महाकुंभात ते संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करत सांगितले की, “आज संपूर्ण देशात हनुमानाच्या जाती-पातीची चर्चा सुरु आहे. ती बंद करा. तुम्ही फक्त आपल्या खासगी स्वार्थासाठी हवे तसे वक्तव्य देत असता, ज्यामुळे भारताचं नुकसान होत आहे. आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही तोडण्याचा. बस करा आता. हनुमान प्राणवायू आहेत. हनुमान सर्वांचे आहेत. कुणीही त्यांना जाती-पातीत विभक्त करु शकत नाही.”
हनुमान दलित होता : योगी आदित्यनाथ
हनुमान दलित होता की अदिवासी हे सर्व प्रकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने सुरु झालं. उत्तर प्रदेशमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं असं बोललं जात आहे.
“हनुमान एक असे देवता आहेत की, ते स्वत: दलित आहेत. हनुमानने दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत सर्वांना जोडण्याचे काम केलं. त्यामुळे आपला संकल्प हा हनुमानासारखा असायला हवा.” असं मत योगी आदित्यनाथ यांनी मांडलं होत.