नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार नुसरत जहा यांचं दर्शन यावेळी संसदेत होणार नाही. हिवाळी अधिवेशनाला नुसरत जहां गैरहजर (Nusrat Jahan Absent in Parliament) राहणार आहेत, त्याचं कारण म्हणजे नुसरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामधील अपोलो रुग्णालयात नुसरत जहां यांना काल (रविवारी) रात्री साडेनऊ वाजता दाखल करण्यात आलं. श्वसनाचा त्रास बळावल्यामुळे नुसरत यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती बिकट झाल्यामुळे डॉक्टरांनी नुसरत यांना कोलकात्यातच आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
नुसरत जहां यांना अस्थमाचा त्रास असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असले, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नुसरत जहां यांनी जून महिन्यात तुर्कीतील बोडरम शहरात निखील जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर नवरात्रीतही त्यांनी पारंपरिक हिंदू पोशाखात पूजा केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. परंतु त्यांनी विरोधकांची तोंडं गप्प केली होती.
दिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा
फिल्मी दुनियेत छाप पाडल्यानंतर नुसरत जहां लोकसभेवर निवडून आल्या. तृणमूल काँग्रेसने नुसरत यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. त्यांनी भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीही नुसरत जहां यांच्या जोडीने खासदारपदी निवडून आल्या आहेत. दोघींनी मे महिन्यात संसदेबाहेर केलेलं फोटोशूट चांगलंच गाजलं होतं. या दोघीही बंगाली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात नावाजलेल्या अभिनेत्री (Nusrat Jahan Absent in Parliament) आहेत.