कोलकाता : ‘टिक टॉक’ बंद केल्याने लोकांना ‘नोटाबंदी’सारखा त्रास होईल, अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड घालणारा हा निर्णय आततायी असल्याचा दावा बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी केला आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 59 चीनी अॅपवर घातलेल्या बंदीविषयी त्या बोलत होत्या. (Nusrat Jahan calls TikTok ban will affect like demonetisation)
‘टिक टॉक’ हे एक मनोरंजन अॅप आहे. हा एक आततायी निर्णय आहे. धोरणात्मक योजना काय आहे? जे लोक बेरोजगार होतील, त्यांचे काय? नोटाबंदीसारखा लोकांना याचा त्रास होईल. त्यावर बंदी घातल्याने मला काही अडचण नाही, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे. परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?” असा सवाल नुसरत जहां यांनी विचारला.
कोलकात्यात ‘इस्कॉन’तर्फे आयोजित उल्टा रथयात्रेच्या कार्यक्रमात नुसरत जहां यांनी भाग घेतला होता. यावेळी त्या माध्यमांशी बोलल्या.
TikTok is an entertainment app. It’s an impulsive decision. What’s the strategic plan? What about ppl who will be unemployed? Ppl will suffer like demonetisation. I don’t have any problem with the ban as it is for national security but who’ll answer these question: Nusrat Jahan https://t.co/xfEYUhSl4v pic.twitter.com/OMmh5FB9je
— ANI (@ANI) July 1, 2020
कोण आहेत नुसरत जहां?
फिल्मी दुनियेत छाप पाडल्यानंतर नुसरत जहां लोकसभेवर निवडून आल्या. तृणमूल काँग्रेसने नुसरत यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. त्यांनी भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीही नुसरत जहां यांच्या जोडीने खासदारपदी निवडून आल्या आहेत. दोघींनी मे महिन्यात संसदेबाहेर केलेलं फोटोशूट चांगलंच गाजलं होतं. या दोघीही बंगाली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
नुसरत जहां यांनी गेल्या वर्षी जून महिन्यातच तुर्कीतील बोडरम शहरात निखील जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर नवरात्रीतही त्यांनी पारंपरिक हिंदू पोशाखात पूजा केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. परंतु त्यांनी विरोधकांची तोंडं गप्प केली होती.
59 चीनी अॅप्सवर बंदी
भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे.
हेही वाचा : निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अॅप अखेर बंद
अॅप बंदीचा चीनला कसा फटका?
⦁ चीनच्या 59 अॅपवर बंदी आल्यानं त्यांच्यापासून सर्वाधिक वेगानं वाढणारा बाजार दुरावणार
⦁ चीनपेक्षाही दुप्पट वेगानं वाढणारा ग्राहकवर्गापासून चीनी कंपन्या वंचित राहणार
⦁ चीनी कंपन्यांच्या उत्पन्नावर स्वाभाविकच दुष्परिणाम होणार
(Nusrat Jahan calls TikTok ban will affect like demonetisation)