‘सीएए’विरोधी आंदोलन झालेल्या शाहीन बागमध्ये कोण आघाडीवर?

| Updated on: Feb 11, 2020 | 12:24 PM

ओखला विधानसभा मतदारसंघात 'आप'चे अमानतुल्ला खान आघाडीवर आहेत

सीएएविरोधी आंदोलन झालेल्या शाहीन बागमध्ये कोण आघाडीवर?
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात ‘सीएए’ विरोधात आंदोलन झालेल्या राजधानी दिल्लीतील शाहीन बागमध्ये भाजप आणि आपच्या उमेदवारामध्ये कांटे की टक्कर सुरु आहे. शाहीन बाग असलेल्या ओखला विधानसभा मतदारसंघात (Okhla Election Result Shaheen Bagh) ‘आप’च्या अमानतुल्ला खान यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

‘भाजप’चे उमेदवार ब्रह्मसिंह ओखलातून पिछाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार परवेझ हाश्मी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. मात्र त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारीही जेमतेम पाच टक्के आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर ‘नोटा’ला मतं मिळाली आहेत. तर बसपचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर आहे.

 

बहुतांश एक्झिट पोलमध्ये ‘आप’चे अमानतुल्ला खान ओखलाची जागा कायम राखतील, असा अंदाज वर्तवला जात होता. ओखला हा मुस्लिमबहुल भाग आहे. या मतदारसंघातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे.

‘आप’ची मुसंडी, भाजपची पिछाडी, केजरीवालांची पुन्हा आघाडी

15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया युनिव्हर्सिटीत झालेल्या हिंसाचारापूर्वी अमानतुल्ला खान यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. जामिया मिलिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी हिंसाचारात सामील नव्हते, उलट भाजप, विहिंप आणि आरएसएसचे कार्यकर्ते यात सहभागी होते, असा दावाही त्यांनी नंतर केला होता. सोशल मीडिया पोस्टद्वारे हिंसा भडकावल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

दिल्लीच्या राजकारणात 12 टक्के मुस्लिम मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात. दिल्लीतील 70 जागांपैकी विधानसभेच्या 8 जाग मुस्लिमबहुल मानल्या जातात. यामध्ये बल्लीमारान, सीलमपूर, ओखला, मुस्तफाबाद, चांदनी चौक, मटिया महल, बाबरपूर आणि किराडी या जागांचा समावेश आहे. या मतदारसंघात 35 ते 60 टक्के मुस्लिम मतदार आहेत. तसेच, त्रिलोकपुरी आणि सीमापुरी जागांवर मुस्लिम मतदारांना महत्त्वपूर्ण मानले जाते.

Okhla Election Result Shaheen Bagh