उस्मानाबाद : लोकसभेच्या उमेदवारी यादीत शिवसेनेने उस्मानाबादसाठी उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे. कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात नॉट रिचेबल खासदार अशी ओळख असलेल्या खासदार गायकवाड यांचे तिकिट कापण्यात आलंय. मतदारसंघात त्यांच्याविरोधात असलेली नाराजी पाहता शिवसेनेने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे आणि नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून युवा सेनेचे ते राज्य सचिव आहेत. ‘मातोश्री’चे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्तासंघर्ष सुरू झाला असून तो आजही सुरूच आहे. याच संघर्षातून ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता. कोणत्याही निवडणुका असल्या की हा संघर्ष अटळ असतो. डॉ. पाटील यांचे हाडवैरी असलेल्या ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसैनिकात जल्लोषाचं वातावरण आहे.
खासदार गायकवाड यांची लोकसभेसह मतदारसंघात असलेली सुमार कामगिरी आणि डॉ. पाटील परिवाराला कडवी झुंज देणारा उमेदवार म्हणून ओमराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. ओमराजे यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबीत असून ते सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणात डॉ. पाटील सध्या जामिनावर आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही . डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला असला तरी ते उमेदवारी भरणार की फुसका बार ठरणार हे पाहावे लागेल. डॉ. पाटील यांचा मुलगा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सून अर्चना यांची नावे चर्चेत आहेत. ओमराजे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी डॉ. पाटील यांना उभे करणार की त्यांचा मुलगा किंवा सून यांना उमेदवारी देणार हे पाहावे लागेल. उस्मानाबाद येथे शिवसेनेच्या वाघाची राष्ट्रवादीच्या सिंहाशी होणारी लढत राज्यभर गाजणार हे मात्र नक्की.
वाचा – अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी