मुंबई : यंदाचा गणेशोत्सव जेवढा सामाजिक उपक्रमांनी गाजला नाही तेवढा तो (Politics Event) राजकीय घडामोडीने चर्चेत आहे. शिंदे गट आणि भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर ऐन महापालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीने (MNS Party) मनसे हे केंद्रस्थानी येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यात 45 मिनिटे चर्चा झाली होती तर आता (Raj Thackeray) राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळीही दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली आहे. राजकीय समिकरणे ही झपाट्याने बदलत असून त्याला आगामी मुंबई महापालिका निवडणूकांचे निमित्त ठरत आहे. आता यामध्ये चर्चा झाली नसून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी सध्याच्या तापलेल्या वातावरणात चर्चा झाली नसेल तरच नवल असेच म्हणावे लागेल.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे शिवसेनेत असल्यापासूनचे आहेत. आता निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे ते पुन्हा युतीच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात का अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मराठी मतासाठी शिंदे गटालाही मनसेसारख्या पक्षाची साथ हवीच आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेनंतर या दोघांमध्ये जवळीकता वाढत आहे. शिवसेनेला एकाकी पाडून मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी हे दोघेजण एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
भले मनसे आणि शिंदे गटात युती विषयी काही बोलणे सुरु नसले तरी गेल्या तीन दिवसांमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेस भेट झाली आहे. आणि निमित्त होते ते बाप्पांचे दर्शनाचे. पण मुंबई महापालिका निवडणूकीत मराठी मतदरांना एक सक्षम पर्याय देण्यासाठी आणि शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी ही युती होणार का हे पहावे लागणार आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर राज ठाकरे हे आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत बाप्पांच्या दर्शनासाठी आले होते.
अद्यापपर्यंत मनसेला ना शिंदे गटाकडून ना भाजपाकडून थेट युतीचा प्रस्ताव आलेला नाही. पण गेल्या चार ते पाच दिवसांमधील घडामोडी पाहता मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूमिका घडणार असे संकेत दिले जात आहेत. हे कमी म्हणून की काय, शिंदे गटाचे किरण पावसकर यांनी तर हिंदूत्वाच्या मुद्यावर ही नैसर्गिक युती झाली तर आनंदच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या वातावरण तर झाले आहे. प्रत्यक्षात घोषणा होते की नाही हे पहावे लागणार आहे.