सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ‘एक वेळ हिजड्यासोबत लग्न केलं तरी मूलं झाली असती, मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती’, असे वक्तव्य गडकरींनी सांगलीत विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गडकरींवर टीका केली जात आहे. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्ते महामार्ग आणि अन्य विकास कामांचा शुभारंभाच्या कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलं.
टेंभू सिंचन योजना पूर्ण होण्यास खूप अडथळे येत होते. ती पूर्ण होईल असे कोणी ठामपणे सांगू शकत नव्हते. पण भाजपाच्या काळात ही योजना पूर्ण झाली. हे सांगताना गडकरी उदाहरण देतांना म्हणाले,
‘एक वेळ हिजड्यासोबत लग्न केलं तरी मूलं झाली असती, मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती. मात्र या योजना आम्ही पूर्ण केल्या. असं माझं मत आहे’, म्हणतं गडकरींनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले.
अतिरिक्त शुल्क साखरेचा विचार करून शेतकऱ्यांनी यापुढे उसाची लागवड करू नये, जर जास्त प्रमाणात साखर तयार झाली तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल, अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली. साखर ऐवजी इथेनॉल तयार करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातून जाणारे विविध महामार्ग आणि अन्य रस्ते या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जवळपास साडेपाच हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सांगली जिल्ह्याच्या दौर्या वर होते.
परदेशात साखरेला 20 रुपये दर आहे, आपल्या कडे 40 रुपये दर आहे, तरीही ऊस दर प्रश्नी आपल्याकडे आंदोलने सुरू आहेत. असे सांगत गडकरी पुढे म्हणाले,
‘साखर कारखाना हा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांचे आणि ऊसतोडणी मजुरांचे शोषण करू नये आणि शेतकऱ्यांनीही कारखाने बंद पडतील अशी आंदोलने करू नये.’
मी जाहीर सांगतो, मी साखर कारखाना काढून चूक केली, मागील जन्मात जे पाप करतात, ते एक तर साखर कारखाना काढतात किंवा पेपर (दैनिक) काढतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सिंचन योजनांची कामं म्हणजे पैसा नसताना केवळ दगड बसवून तयार केलेली स्मारकं होती, असेही यावेळी गडकरी म्हणाले.