अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला वेगवेगळं नाव मिळालं. निवडणूक चिन्हही जाहीर झालं. त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाव जरी त्यांच्याकडे असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे’ अशा शब्दांत जयदीप ठाकरे यांनी या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दोन्ही गटांचं नाव आणि चिन्हाबाबत टीव्ही 9 मराठीने जयदीप ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
जे झालं ते वाईट झालं, असंही जयदीप ठाकरे यांनी म्हटलं आहे. जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटाला आपलं समर्थन दिलंय. लवकरच आपण त्यांची (उद्धव ठाकरेंची) भेट घेणार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल, ती आपण आनंदाने स्वीकारु, असंही ते म्हणाले.
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं नाव निवडणूक आयोगाने दिलं आहे. ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह मशाल असेल. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असं नाव निवडणूक आयोगानं दिलंय. शिंदे गटासाठी ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह असेल, हे देखील मंगळवारी स्पष्ट झालंय.
अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरुपात निवडणूक आयोगाने नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह जाहीर केलंय. यात शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता नवी नावं काय असतील, हेही स्पष्ट झालंय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायलाही सुरुवात झालीय.
दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे हे शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसून आले होते. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता उद्धव ठाकरे जयदीप ठाकरे यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवतात का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.