गणेश सोळंकी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा : नागपूरचा (Nagpur) गणवेश घातला की तो व्यक्ती डायरेक्ट जॉईन्ट सेक्रेटरी (Joint Secretory) होतो, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता जोरदार टोला हाणला. त्यामुळे नाना पटोलेंचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच होता की आणखी कुणावर, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. ते बुलढाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
नाना पटोले यांनी म्हटलंय की…
प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला यूपीएससीच्या परीक्षा पास कराव्या लागतात. पण आता परीक्षा नाही. नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईन्ट सेक्रेटरीच्या लेव्हलवर जातो, असं आपण पाहिलंय.
हे सुद्धा वाचा
सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यताय. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या नुकत्याच तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय.
दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यावर राम कदम यांनीही प्रत्युत्तर दिलंय. संघाच्या गणवेशावर बोलण्याआधी आधी संघाच्या शाखेवर जाऊन पाहावं. देशप्रेम काय असतं, समर्पित भावानं लोकांची सेवा कशी करायची असते हे तेव्हा त्यांना कळेल, असं राम कदम यांनी नाना पटोले यांना उद्देशून म्हटलंय.
सत्तेच्या काळात वसुलीचा कार्यक्रम केल्याचा आरोप राम कदम यांनी महाविकास आघाडीवर केलाय. तसंच अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून पैसे घेतल्याचाही गंभीर आरोप राम कदम यांनी यावेळी केला. आरएसएसवर बोलण्याआधी काँग्रेसने काय केलं, यावरुनही राम कदमांनी नाना पटोलेंना सुनावलं.
संघावर बोलण्याआधी भारत तोडो म्हणणारे नेते तुमच्या पक्षात येता, आणि तुमचे नेते मग भारत जोडो म्हणत देशभर फिरतात, याच्यावर आधी बोला, असं राम कदम यांनी म्हटलंय.