माढा : भाजपने यावेळी माढा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होती. इथे भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी ही लढत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात असल्यासारखीच होती. शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि भाजपने रणजित सिंह मोहिते पाटलांच्या रुपाने मोठ्या नेत्याला हाताशी घेतलं. त्यामुळे या लढतीमध्ये चुरस निर्माण झाली. पण एवढं करुनही माढ्यात सहापैकी तीन मतदारसंघांमध्येच भाजपला आघाडी मिळवता आली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली ती माळशिरसने. इथे भाजपला एक लाखांपेक्षा जास्त आघाडी मिळाली आणि भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.
करमाळा
मतमोजणी चालू असताना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये कधी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे, तर कधी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर होते. पण दोघांच्या आघाडीमधील फरक अत्यंत कमी होता. पण माळशिरसने निंबाळकरांना विजयी आघाडी करुन दिली. करमाळ्यापासून सुरुवात केल्यास इथे संजय शिंदेंनाच आघाडी मिळाली. निंबाळकरांनी इथे 71503, शिंदेंनी 101932, वंचितच्या विजय मोरेंनी 6406 मते घेतली. करमाळ्यात संजय शिंदेंना 30429 मतांची आघाडी मिळाली.
माढा
माढा विधानसभा मतदारसंघातही संजय शिंदेच वरचढ ठरले. निंबाळकरांना 96562, संजय शिंदेंना 105067 आणि विजय मोरेंना 9552 मते मिळाली. माढ्यात संजय शिंदेंनी 8505 मतांची आघाडी घेतली. संजय शिंदे यांची आघाडी अत्यंत कमी असली तरी या मतदारसंघात त्यांनी वर्चस्व कायम राखलं.
माळशिरस
भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं ते माळशिरस मतदारसंघाने. इथे निंबाळकरांनी 143025 मते घेतली. तर शिंदेंना केवळ 42395 मते मिळाली आणि विजय मोरेंनी 9721 मते मिळवली. या मतदारसंघात निंबाळकरांना सर्वाधिक एक लाख 630 मतांची आघाडी मिळाली. यानंतर त्यांची आघाडी वाढतच गेली आणि राष्ट्रवादीच्या विजयाच्या आशा मावळल्या.
सांगोला
सांगोला मतदारसंघातही शिंदेंनीच आघाडी घेतली. पण आकडा अत्यंत कमी होता. सांगोल्यात निंबाळकरांनी 78746, शिंदेंनी 82120 आणि विजय मोरेंनी 9618 मते घेतली. सांगोला मतदारसंघाने शिंदेंना 3374 मतांची आघाडी दिली. पण माळशिरसमध्ये मिळालेल्या भरघोस मतांमुळे शिंदे पुढे जाऊ शकले नाही.
फलटण
यानंतर निंबाळकरांचं होमग्राऊंड असलेल्या फलटणमध्येही शिंदे पिछाडीवर पडले आणि ही पिछाडी वाढतच गेली. फलटणमध्ये निंबाळकरांनी 94879, शिंदेंनी 93666 आणि विजय मोरेंनी 9998 मते घेतली. होमग्राऊंड असलेल्या फलटणमध्ये निंबाळकरांना अत्यंत कमी म्हणजे केवळ 1213 मतांची आघाडी मिळाली.
माण
सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे विधानसभा मतदारसंघ माढ्यात येतात. माण मतदारसंघानेही निंबाळकरांच्या विजयाला हातभार लावला. इथे निंबाळकरांनी 96476, शिंदेंनी 73261 आणि विजय मोरेंनी 6048 मते घेतली. माणमधून निंबाळकरांना 23215 मतांची आघाडी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवला.
85764 मतांनी निंबाळकरांचा विजय
भाजपच्या निंबाळकरांना एकूण 586314, राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंना 500550 आणि वंचितच्या विजय मोरेंना 51349 मते मिळाली. निंबाळकरांनी एकूण 85764 मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे 23215 मतांची लीड देणाऱ्या माणमध्ये काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी निंबाळकरांना मदत केली होती.