मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची अखेर ‘घरवापसी’ झाली. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. त्यांच्यासह जुन्नरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलं. मातोश्रीवर दहा हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आल्याचं शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. अनेकांना मातोश्रीमध्ये प्रवेश करता आला नाही.
शरद सोनवणेंचा शिवसेना प्रवेश हा मनसेची राजकारणातील पाटी कोरी झाल्याचं स्पष्ट दाखवतो. शरद सोनवणेंनी कुणावरही नाराज होऊन मनसे सोडलेली नाही, तर घराची ओढ लागते तशी शिवसेनेची ओढ लागली होती म्हणून मनसे सोडतोय, असं त्यांनी सांगितलं. मनसेत असताना राज ठाकरेंनी खुप सन्मान दिला. नाराज आहे म्हणून शिवसेनेत आलो नसल्याचं यावेळी शरद सोनवणे यांनी म्हटलंय.
शरद सोनवणे कधी मनसेत आले आणि कधी गेले हे कळलंच नाही. त्यांच्या जाण्याने मनसेला काही फरक पडणार नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोनवणेंवर केली. शिवाय शरद सोनवणे हे आमच्यासाठी एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग अॅसेट होते, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
सोनवणे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिरुर मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झालाय. शिरुरमध्ये शिवसेनेची बाजूही बळकट होणार आहे. कारण, शिरुरमधील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. तर एक मनसे आणि एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मनसेकडे असलेल्या मतदारसंघाची ताकद आता शिवसेनेच्या मागे उभी राहणार आहे.
शरद सोनवणेंच्या शिवसेना प्रवेशाचा व्हिडीओ