औरंगाबाद : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजपाकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमदेवारी देण्यात आली होती. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या रिंगणात आहेत. भाजपाने आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
दानवे यांनी भाजपाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. भलेही ते आमच्या विरोधात असतील मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतला आहे. आमच्या भगिनी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्वमधून उभ्या आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार याची आम्हाला खात्री होती.
रमेश लटके यांच निधन दुर्दैवी आहे. ते शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. शाखाप्रमुखापासून ते आमदारापर्यंत पोहोचले. ते या परिसरात 24 तास शिवसेनेचं कार्य करत होते. त्यामुळे अंधेरीमध्ये आमची ताकद आहे. आम्ही निश्चित निवडून येणारच होतो. मात्र भाजपाने माघार घेतली हा चांगला निर्णय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे नारायण राणे यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर टीका सुरू आहे. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी राणेंवर बोलणे टाळले. राणेंवर बोलण्याची गरज नसल्याचं दानवे यावेळी म्हणाले.