कल्याण : शिवसेना खासदार संजय राऊत एका दिवशी स्तुती करतात, दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर टीका करतात, असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. राऊत यांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले. (Pravin Darekar taunts Sanjay Raut)
संजय राऊत एका दिवशी एका व्यक्तीची स्तुती करतील, तर दुसऱ्या दिवशी त्याच्याविरोधात टीका करतील. त्यांचा एकही दिवस टीका आणि स्तुती केल्याशिवाय जात नाही. एका दिवशी बोलले नाही, तर त्यांना वाटते प्रॉब्लेम होईल. त्यामुळे संजय राऊत म्हणजे ‘नेमेचि येतो पावसाळा’ अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
आमच्या पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रचनात्मक काम केले आहे. संजय राऊत यांनी कोणतीही संस्था उभी केलेली नाही. रचनात्मक काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना विखे पाटलांच्या विरोधात टीका करण्याचा अधिकार नाही, असंही दरेकर म्हणाले.
दरम्यान, आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या सामनातील अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले.
“मला, माझ्या मुलाला आणि आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम त्या जनतेशी आहे. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय तेही लपून राहिलेले नाही” असा घणाघात विखेंनी केला आहे.
VIDEO : आताच्या अग्रलेखात फक्त लाचारी दिसते, विखे-पाटलांचं संजय राऊतांना पत्र https://t.co/CFqj53fmb5
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2020