मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना (Opposition leaders meet Sharad Pawar) चांगलाच वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या भेटीला (Opposition leaders meet Sharad Pawar) पोहचले. विशेष म्हणजे त्याआधी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील शरद पवार यांना भेटून गेले. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोललं गेलं. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले, “राज्यात अभुतपूर्व स्थिती आहे. देवेंद्र फडणवीस आज सत्तास्थापनेचा दावा करायला गेले असं वाटत होतं. मात्र, त्यांनी राजीनामा दिला. शरद पवार हे राज्यातील मोठा अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. आता यातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. ते राजकीय संकेत पाळून सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण देतात की नाही यावर आमचं लक्ष आहे. जनतेने जो कौल दिला तो भाजपने स्वीकारुन निर्णय घ्यायला हवा होता, असंच पवारांचं म्हणणं आहे. आम्ही अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.”
कोणत्या पक्षाला बोलवायचं याचे काही संकेत आणि नियम आहेत. ते राज्यपालांनी पाळायला हवेत. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मात्र, कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे सरकार स्थापनेची जबाबदारी भाजपची होती. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा, असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदुत्व विचारधारेच्या पक्षाला पाठिंबा देण्यास विरोध केला होता. यावर विचारले असता सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना आपली विचारधारा आहे. भाजपला वेगळं ठेवायचं आहे. मात्र, त्यासाठी रणनीती ठरलेली नाही.”
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रात 15 दिवसांपासून पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देताना अनेक विकास कामं केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या नाकर्तेपणाला जनतेनं उत्तर दिलं आहे. त्यांनीही ती परिस्थिती मान्य केली आहे. मागील 4 वर्ष झाले दुष्काळ पडला आहे. मग त्यांनी यावर उपाययोजना करण्याऐवजी बुलेट ट्रेनसारख्या गोष्टी का रेटल्या. या गोष्टींवर खर्च करण्यासाठी त्यांनी राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर का वाढवला.”
संपूर्ण महाराष्ट् ओल्या दुष्काळाने घेरला आहे आणि हे सत्तेत गुंतले आहेत. आमचं लक्ष राज्यपालांच्या भूमिकेवर आहे. ते काय निर्णय घेतात यावरच पुढील निर्णय ठरेल. राज्यपालांनी आज सर्व सूत्रे हातात घेतली, तरी त्यांना शेतकऱ्यांना मदत करता येणार आहे. त्यांनी ते करावं. आम्हीही याबाबत विरोध करणार नाही. मात्र, लवकरात लवकर घटनात्मक सरकार यावं. सरकार कुणाचं येणार हे राज्यपालांनी बोलावल्यानंतर ठरेल. राज्यपालांनी 15 दिवस वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पूर्व युती अपयशी ठरल्याचं मान्य केलं आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.