नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या पुढे जागा दाखवण्यात आल्या आहेत. पण लोकसभेच्या निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती झाल्यास विरोधकांनी सत्तास्थापनेची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याबाबतचं पत्र देण्याचंही नियोजन विरोधी पक्षांनी केलंय. निकालानंतर आम्हालाही 272 हा बहुमताचा आकडा सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी विनंती विरोधी पक्षांकडून केली जाणार आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रपतींना पत्र लिहिलं जाईल. निवडणूक निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हालाही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाईल. या पत्रासोबत देशात आतापर्यंत त्रिशंकू परिस्थितीत सरकार स्थापनेसाठी कशी प्रक्रिया झाली त्याची यादीही रेफरन्ससाठी देण्यात येणार आहे.
या पत्रावर टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, बसपा प्रमुख मायावतींचे प्रतिनिधी सतीश मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, डीएमके या पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही असं म्हणत हे विरोधक एकत्र आले आहेत.
चंद्राबाबू गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील राजकारणात सक्रिय झाले आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पण तिसऱ्या आघाडीसाठीही प्रयत्न सुरु आहेत. चंद्राबाबूंनी काँग्रेस नेतृत्त्वाचीही भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि जेडीएसचे नेते एचडी देवेगौडा यांचीही भेट घेतली.
VIDEO :