मुंबई: पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर देशाच्या आगामी राजकारणाची वाटचाल अवलंबून आहे. यानंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होतील, असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वर्तविले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण ममता बॅनर्जी ही एकटी वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. ही लढाई अटीतटीची आहे. पण या लढाईत ममता बॅनर्जी बाजी मारतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Shivsena leader Sanjay Raut on West Bengal Assembly Election 2021)
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. महाभारताचे युद्ध 21 दिवसांत संपले पण कोरोनाचा 18 दिवसांत अंत होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. पण आज वर्ष उलटून गेल्यानंतरही कोरोना कायम आहे. त्यामुळे मोदी सरकारला कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. कोरोनाला हरवता न आलेले मोदी सरकार आता पश्चिम बंगामध्ये ममतांच्या पराभवासाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नवं महाभारत घडत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. देशातील लोकशाहीवर आजपर्यंत नेहमीच आघात झाले. प्रत्येकवेळी लोक त्याविरुद्ध लढले. त्यामुळेच आज देशातील लोकशाही जिवंत आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये 30 मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नंदीग्राम मतदारसंघाचाही समावेश आहे. या एका मतदारसंघात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या 22 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बुथवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.
पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा निकाल समोर आला होता. यामध्ये नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, असे म्हटले होते. हा अहवाल बाहेर फुटल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, तृणमूल काँग्रेसकडून हा अहवाल खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. नंदीग्राममध्ये भाजपचा मोठ्या फरकाने पराभव होईल. भाजप खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने ट्विट करुन केला होता.
संबंधित बातम्या:
West Bengal Election: भाजपच्या ‘या’ नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?
(Shivsena leader Sanjay Raut on West Bengal Assembly Election 2021)