कीर्तनकार महाराजांसाठी थेट हेलिकॉप्टरच धाडलं? सांगलीतल्या घटनेची राज्यात चर्चा…

| Updated on: Jan 06, 2023 | 3:31 PM

कीर्तनकार महाराज हेलिकॉप्टरमध्ये बसतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय.

कीर्तनकार महाराजांसाठी थेट हेलिकॉप्टरच धाडलं? सांगलीतल्या घटनेची राज्यात चर्चा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शंकर देवकुळे, सांगलीः कीर्तनकार (Kirtankar) महाराज म्हटलं की अगदी साधी राहणी अशी प्रतिमा असते. गाव-खेड्यातल्या कीर्तनासाठी महाराज कारने येतात. पण सांगलीतल्या (Sangli) एका गावात कीर्तनासाठी आलेल्या महाराजांचा वेगळाच थाट करण्यात आला. महाराजांचं पुढील कीर्तन वेळेत होण्यासाठी आयोजकांनी थेट हेलिकॉप्टरचीच (Helicopter) व्यवस्था केली. कीर्तनकार महाराजांचे प्रासादिक शब्द ऐकण्यासाठी केलेली ही सोय राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

काय घडली घटना?

केज तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात काल कीर्तनाचे निमंत्रण देण्यात आले होते. सांगलीतली त्यांची रामकथा दुपारी पाच वाजता संपली. महाराजांना पुढील दोन तासात पुणे जिल्ह्यातील वाघोलीत पोहोचायचे होते.

सांगली ते वाघोली हे अंतर 5  तास 17 मिनिटांचे होते आणि शर्मा महाराज यांची गुरुवारची रामकथा सायंकाळी पाच वाजता संपणार होती. दोन तासांत महाराजांना कारने वाघोली येथे पोहोचणे आवश्यक होते. कारने हा प्रवास करण्यासाठी महाराजांना पाच तास लागणार होते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांच्या कीर्तनासाठी आयोजक शांताराम खटके व भाविकांनी त्यांच्यासाठी थेट सांगली ते वाघोली अशी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज शर्मा हे केवळ 55 मिनिटांत वाघोली येथे कीर्तनासाठी सायंकाळी पोहचले.

राजकीय पुढाऱ्यांच्या प्रवासासाठी तत्काळ हेलिकॉप्टरची सुविधा केलेली आपण आतापर्यंत पाहिली आहे. मात्र कीर्तनकार महाराजांसाठीची ही व्यवस्था सांगली आणि परिसरात चांगलाच चर्चेत आहे.

कीर्तनकार महाराज हेलिकॉप्टरमध्ये बसतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. तर आयोजकांनी कार्यक्रम वेळेत पार पडण्यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे समाधान महाराजदेखील भारावून गेले.