उस्मानाबाद : लोकसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नसून उस्मानाबादमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर करण्यासाठी ‘आधी तू नंतर मी’ ही रणनीती आखली आहे. उस्मानाबादचे विद्यमान शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी अदखलपात्र मानते. मात्र, पाटील कुटुंबाचे हाडवैरी असलेल्या राजेनिंबाळकर कुटुंबात उमेदवारी गेल्यास डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करायचा अशी रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे.
खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास डॉ. पदमसिंह पाटील यांची सुन अर्चना पाटील आणि राजेनिंबाळकर यांना मिळाल्यास डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना रिंगणात उतरविण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. राष्ट्रवादीचा प्रचार आणि निवडणूक यंत्रणा डॉ. पदमसिंह पाटील यांच्या भोवती केंद्रित असणार आहे.
शिवसेनेत मात्र उमेदवारीसाठी अनेक गट सक्रिय झाले आहेत. उमेदवारी जाहीर होताच गटबाजी संपून बाण हाच उमेदवार मनात शिवसैनिक परंपरेप्रमाणे प्रचाराला लागतील. राष्ट्रवादीला मात्र पक्ष अंतर्गत नाराजी आणि घराणेशाहीच्या आरोपाला सामोरे जावे लागणार आहे.
पवार साहेबांच्या मुलीचे, पुतण्याचे आणि नातवाचे भविष्य घडवण्याच्या नादात आपल्या मुलांचे भविष्य खराब करू नका, असे आवाहन भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील घराणेशाहीला थेट टार्गेट केले आहे. उस्मानाबादमध्येही राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर भाजप निशाणा साधत आहे.