उस्मानाबाद | राज्यातील सत्तातरानंतर आता शिंदे गटातील (Shinde group) आमदार यांच्यात मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आमदार मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत तर त्यांचे समर्थकही वेगवेगळ्या मार्गांनी यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणी देवाला साकडं घालत आहेत तर कुणी मुख्यमंत्र्यांकडे (CM Eknath Shinde) थेट पत्राद्वारे मागणी करत आहेत. कुणी भाजपच्या दिग्गज नेत्यांकडे लॉबिंग करत आहेत. तर कुणी विकासासाठी नेत्यांना मंत्रिपद द्यावे यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. उस्मानाबादेत थेट रक्ताने पत्र लिहिण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी येथील तरुण सरपंचांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले आहे. येथून शिंदे गटात गेलेल्या तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी घेतलेली भूमिका योग्य असून विकासासाठी त्यांना मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी केलीय.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे,
आपणास साष्टांग नमस्कार.. मी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील साडेसांगवी या गावाचा सरपंच सुभाष रामचंद्र देवकते. गेल्या दहा वर्षापासून कट्टर शिवसैनिक म्हणून काम करीत असून आमदार डॉ तानाजी सावंत यांनी भूम विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी घेतलेल्या निर्णयासोबत आहे.
माननीय आमदार तानाजीराव सावंत यांना महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी, यासाठी मी आपणास माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीत आहे. सावंत यांच्या आपुलकी व प्रेमापोटी हे पत्र लिहीत आहे. तरी आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सावंत साहेबांना संधी देऊन आमच्या भूम परंडा वाशी व धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सहकार्य करावे ही मला अपेक्षा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र…
उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश देशातील आकांक्षित जिल्ह्यात आहे. त्यामुळे अनेक कामे वर्षानुवर्षे येथे झाली नाहीत. जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे, सिंचन, 7 टीएमसी पाणी, औद्योगिक वसाहत, तीर्थक्षेत्र विकास, शिक्षण, मेडिकल कॉलेज ही कामे सावंत मार्गी लावू शकतात. त्यामुळे सावंत यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी समर्थकांनी केली. शिंदे गटातील आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी तुळजाभवानी व धारासूर मार्दीनी मातेची महाआरती करीत देवीला साकडे घातले. माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्यासह समर्थकांनी देवीची पूजा करीत साकडे घातले, मागील मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक विकास कामे खोळंबली होती. कृषी, सिंचन, उद्योगसह अन्य कामे मार्गी लावण्यासाठी सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा अशी मागणी करीत साकडे घातले.