संतोष जाधव, उस्मानाबादः मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी कारखाना अशी ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना (Terna Sugar Factory)… या कारखान्याचा ताबा 25 वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत (Tanaji Sawant) यांच्या भैरवनाथ समुहाकडे दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला तेरणा कारखान्याच्या सभासदांसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भैरवनाथ शुगरचे (Bhairavnath Sugar) चेअरमन शिवाजीराव सावंत आणि जिल्हा बँकेच्या अधिकार्यांनी कारखानास्थळी जाऊन ही कार्यवाही पूर्ण केली.
डीआरएटी कोर्टाच्या निकालानंतर अखेर सोमवारी तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ समुहाकडे देण्याच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यावेळी साखर कारखान्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत, व्हा.चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, तालुकाप्रमुख अजित लाकाळ पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.अजित खोत, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील, राहुल वाकुरे पाटील, यांच्यासह कारखान्याचे सभासद, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेरणा साखर कारखान्यावरील कर्जामुळे जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे तब्बल 12 वर्ष या कारखान्याच्या सभासद शेतकर्यांसह ऊस उत्पादकांचे हाल झाले. तेरणा कारखाना आता भैरवनाथ शुगरकडे आल्यामुळे तेरणाच्या सभासदांसह कामगार, परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून या कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देणार असल्याची प्रतिक्रिया भैरवनाथ समुहाचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केली.
तेरणा सुरु झाल्यानंतर हजारो कामगार यांना रोजगार मिळणार आहे. तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचा उसाचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. तेरणामुळे गतवैभव प्राप्त होणार आहे. शेतकरी सभासद यांनी आनंद व्यक्त केला. शेतकरी यांनी यावेळी जुन्या आठवणी ताज्या केल्या.
एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या तेरणा कारखान्यातून सोन्याचा धूर निघत होता मात्र त्यानंतर याला काही राजकीय लोकांची नजर लागली आणि राजकीय कुरघोडी यातून आरोप प्रत्यारोप यातून तेरणा कारखाना अखेर भंगार झाला…
मात्र आता पुन्हा एकदा तेच दिवस येतील अशी आशा शेतकरी, सभासद यांनी व्यक्त केली. तर तेरणेमुळे व्यापार बाजारपेठ बहरेल असे काही दुकानदार यांनी सांगितले.
ज्याच्या हाती तेरणा त्याच्या हाती सत्तेच्या चाव्या असे तेरणा कारखान्याचे राजकीय समीकरण असून आगामी काळात राजकीय चित्रही बदलणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे राजकीय प्रभावक्षेत्र असलेला हा भाग आहे.
पाटील-निंबाळकर कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात याच तेरणा पट्ट्यातून झाली आहे. आगामी काळात डॉ सावंत यांची राजकीय भूमिका महत्वाची ठरणार आहे.