मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेतून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 ला तुम्ही मला पंतप्रधान केलं, अनेक मोठ्या मोठ्या नामदारांना जेलपर्यंत नेलं, यावेळी सत्ता द्या, त्यांना तुरुंगात टाकतो, असं मोदी म्हणाले. शिवाय मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूंना घरात घुसून मारतो हे आम्ही दाखवून दिलंय, असंही ते म्हणाले.
मुंबईतील बीकेसीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मुंबईतील युतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. योग्य ठिकाणी तुमचं मत द्या, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
मी छत्रपतींचा मावळा : मोदी
काँग्रेसच्या काळात हल्ले झाल्यानंतर फक्त गृहमंत्री बदलला जायचा. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यानंतर सर्व जण आपापल्या कामावर निघून गेले. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता की हे आम्ही किती दिवस सहन करणार? दहशतवाद्यांना शिक्षा मिळणार नाही का? तुमच्या या चौकीदाराने या परिस्थितीतून देशाला बाहेर काढलं. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, दहशतवाद्यांना आम्ही घरात घुसून मारु हे आम्ही दाखवून दिलंय, असं मोदी म्हणाले.
मोदींकडून मध्यमवर्गीयांचे आभार
या सभेत मोदींनी मध्यमवर्गीयांचे त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाबद्दल आभार मानले. काँग्रेसने एका कुटुंबाच्या पिढीला वाचवण्यासाठी एक योजना आणली आहे, ज्याचा भार मध्यमवर्गीयांवर टाकला जाईल. पण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गीयांसाठी कशाचाही उल्लेख नाही. मध्यमवर्गीय देश चालवतात. पण त्यांना सन्मान देण्याचं काम पहिल्यांदा आमच्या सरकारने केलं, असं मोदी म्हणाले.
2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच सर्वात कमी जागा जिंकल्या. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पहिल्यांदाच सर्वात कमी जागा लढत आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पुढचे पाच वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जगातील प्रमुख नेतृत्त्वांकडे पाहिलं तर हे लक्षात येईल. पण काँग्रेसमध्ये सध्या फक्त संभ्रमाचं वातावरण आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसने पोलिसांना कधीही सन्मान दिला नाही : मोदी
मोदींनी त्यांच्या सभेत मुंबई पोलिसांच्या बलिदानाचाही उल्लेख केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच मुंबई सुरक्षित आहे, असं ते म्हणाले. पोलिसांना बदनाम करण्याची फॅशन झाली आहे. पण कोणताही सण-उत्सव असो, त्यांच्या घरात कुणी आजारी असो, पोलीस कर्तव्यावर हजर असतो, असं मोदी म्हणाले. शिवाय पोलिसांना काँग्रेसने आजपर्यंत कधीही सन्मान दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. आजपर्यंत 33 हजार पोलिसांनी देशासाठी बलिदान दिलंय. पण आमच्या सरकारने दिल्लीत भव्य स्मारक बांधून त्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. त्यात महाराष्ट्र पोलिसांचाही समावेश आहे, असं मोदींनी सांगितलं.