जळगाव : आम्ही शिवसेना (shivsena) पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला. शिवसेनेचे जळणारे घर वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल, असं विधान गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले आहे. तब्बल 13 दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले होते. यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. बंड का केलं त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. तसेच आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला, असा दावा त्यांनी केला.
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावं, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली होती. बंड केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत बोलत असताना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांवर टीकास्त्र सोडलं. या लोकांमुळेच शिवसेनेचं नुकसान झालं आहे. या चार लोकांच्या कोंड्याळ्यांनी उद्धव ठाकरेंना बावरट केल्याचा दावा त्यांनी केला होता.