ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये होमहवन करण्यात आलं. पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून बदलापूर राष्ट्रवादीने चक्क होमहवन केलं. नेत्यांना राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात न जाण्याची सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या चरणी या होमहवनच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी या महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. या अनोख्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरु
काही दिवसांपूर्वीच शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही शिवबंधन बांधलं. आता अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला गळती लागल्याचं चित्र आहे.
सोलापुरातील आमदारांनी धाकधूक वाढवली
सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांनी पक्षाची धाकधूक वाढवलीय. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी दांडी मारली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात दाखल झाले. मात्र अजित पवार घेत असलेल्या मुलाखतीला बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी जाण्याचं टाळलं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलंय.
गेल्या कित्येक दिवसांपासून बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तर माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे माढ्यातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातच दोन्ही आमदारांनी मुलाखतीला जाणं टाळल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालंय.
30 जुलैला राष्ट्रवादीला मोठं भगदाड?
येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.
अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोहिम फत्ते केल्याची माहिती आहे.