पालघर : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघरमधून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथील एका ग्रायपंचतीच्या निवडणुकीत विद्यमान आमदाराच्या बहिणीलाच परभवाचा जबरदस्त धक्का बसला आहे. आमदाराची बहिण सरपंच पदाची निवडणुक हरल्यामुळे या पराभवाची पालघर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पालघर जिल्ह्यातील माकपचे एकमेव आमदार विनोद निकोले यांच्या बहिणीला पराभवाचा धक्का बसला आहे. निकोले यांच्या बहिण विद्या निकोले या उर्से ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
विद्या निकोले यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे सरंपच होण्याचे स्वप्न भंगले आहे. विनोद निकोले आमदार असताना त्यांच्या बहिणीचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्या निकोले यांच्या विरोधात निवडणुक लढवणाऱ्या अनुसया अनंता गुहे या अपक्ष उमेदवाराने त्यांचा दारुण पराभव केला आहे. 60 पेक्षा अधिक मताधिक्याने अनुसया गुहे या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत.
सर्वसामान्यांसारखा राहणारा आमदार अशी विनोद निकोले यांची ओळख आहे. आमदार झाल्यानंतरही ते पत्र्याच्याच घरात राहत होते. लोकप्रतिनिधी असूनही एका आमदाराचे घर पत्र्याचे कसे काय असू शकते. त्यांच्या या साधेपणामुळे विनोद निकोले चर्चेत आले होते.
केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही हे दाखवून देत विनोद निकोले यांनी थेट विधानसभा गाठली. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे कॉम्रेड विनोद निकोले यांनी निवडणुक लढवली.
भाजपच्या पास्कल धनारे यांचा निकोले यांनी चार हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मालमत्तेच्या बाबतीत ते सर्वांत गरीब आमदार असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञा पत्रातून दिसून येते.