पालघर लोकसभा मतदारसंघ : पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपतून शिवसेनेत आलेल्या राजेंद्र गावित यांनी बाजी मारली. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांचा पराभव केला.पालघर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.73 मतदानाची नोंद झाली. 2014 च्या लोकसभा मतदान टक्केवारी आणि 2018 मध्ये झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यावेळी जवळपास 1 टक्क्यांनी जास्त मतदान झालं. पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडी पुरस्कृत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून शिवसेनेचे आयात उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित रिंगणात होते. या दोघात चुरशीची लढत झाली.
पालघर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | राजेंद्र गावित (शिवसेना) | विजयी |
बहुजन विकास आघाडी | बळीराम जाधव | |
अपक्ष/इतर |
राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक
2014 च्या पालघर लोकसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या लढतीत भाजपचे चिंतामण वनगा यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पालघर लोकसभेची जागा भाजप पारंपारिक लढवत होते. मात्र यंदा उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा शिवसेनाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. मात्र जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचे सहापैकी वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा, बोईसर विधानसभा असे तीन विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने इथे सर्व ताकदीनिशी ही जागा लढवली. त्यामुळे पालघर लोकसभेची ही जागा बहुजन विकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारी आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विधानसभा नुसार झालेले मतदान
2014 मध्ये झालेल्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 61.53 टक्के मतदान झालं. यामध्ये भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे निवडून आले होते. वनगा यांना 5 लाख 33 हजार 201 मते मिळाली तर बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 681 मते मिळाली. दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे 2 लाख 39 हजार 520 मतांनी विजयी झाले होते.
2014 च्या या लढतीत वनगा यांना डहाणू विधानसभा मतदारसंघात 66 हजार 774 विक्रमगड मतदारसंघात 75 हजार 571 पालघर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 2 हजार 602 बोईसर मतदारसंघात 94 हजार 308 नालासोपारा मतदारसंघात 1 लाख 4 हजार 723 तर वसई मतदारसंघात 89 हजार 18 मते मिळाली होती. यामध्ये त्यांना सर्वाधिक मते नालासोपारा मतदारसंघ आणि पालघर मतदारसंघात मिळाली होती. या सहाही मतदारसंघात त्यांना एकूण 5 लाख 33 हजार 201 इतके मतदान झाले.
तर हेच मतदान बळीराम जाधव यांना डहाणू विधानसभेत 26 हजार 198 विक्रमगड मतदारसंघात 43 हजार 346 पालघर विधानसभा मतदारसंघात 30 हजार 67 बोईसर मतदारसंघात 48 हजार 691 नालासोपारा मतदारसंघात 71 हजार 199 तर वसई मतदारसंघात 74 हजार 68 असे मतदान राहिले त्यांना या सहाही मतदारसंघ 2 लाख 93 हजार 681 इतकी मते मिळाली होती.
2019 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातील 129 विधानसभा क्षेत्र विक्रमगड या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच 69.50 %इतकं मतदान झाले असून, पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या नालासोपारा विधानसभेत 52.16 इतकं सर्वात कमी मतदान झालं. पालघर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 85 हजार 297 मतदार असून त्यापैकी 12 लाख 1 हजार 298 आपला मतदानाचा हक्क बजावला.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट
पालघर लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ असून, येथील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. मात्र असं असलं तरी येथील बेरोजगारी , आरोग्य, कुपोषण, शिक्षण या महत्त्वाच्या विषयांना डावलत हितेंद्र ठाकूर यांची गुंडागर्दी तसंच महायुतीकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांची झालेली फसवणूक यावर आरोप-प्रत्यारोप सुरु होते. या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचार सभा घेतल्या.