मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट दिलं जाणार आणि भाजपकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(Pandharpur Assembly by-election date announced)
>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.
पोटनिवडणुकीबाबत रविवारी होळकरपाडा इथं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीत पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा भाजपनं धनगर समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीनं केली आहे.
संबंधित बातम्या :
Pandharpur Assembly by-election date announced