रवी लव्हेकर, पंढरपूरः थोडक्याच काळात महाराष्ट्रातील साखर सम्राट अशी ओळख मिळवलेले अभिजित पाटील (Abhijit Patil) हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अगदी महिनाभरापूर्वीच अभिजित पाटील यांच्या विविध साखर कारखान्यांवर आयटी विभागातर्फे धाड टाकण्यात आल्या होत्या. मात्र ही नुसती चौकशी असून मी अधिकाऱ्यांच्या चौकशीला पूर्ण उत्तरं दिली आहेत, असं त्यावेळी अभिजित पाटील यांनी म्हटलं होतं. अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या अगदी जवळचे मानले जातात. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. अभिजित पाटील यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. या दोहोमध्ये जवळीक वाढल्याचेही चित्र आहे.
सांगोल्यात चंद्रकांत पाटील यांची आणि अभिजित पाटील यांच्या भेटीची जोरदार चर्चा आहे. यावेळी काय झाडी काय डोंगर वाले सांगोल्याचे फेमस आमदार शहाजीबापू पाटीलही उपस्थित होते.
अभिजित पाटील यांच्याविरोधात झालेल्या छापेमारीनंतरच ते भाजपात येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पाटील यांच्याविरोधात नेमकं काय हाती लागलं, याची माहिती उघड झालेली नव्हती. मात्र पाटील यांना क्लिनचिट मिळेल, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं होतं…
अभिजित पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या संदर्भाने पुन्हा एकदा लाँड्री मशीन, धो डाला… अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अभिजित पाटील हे मूळचे पंढरपूर येथील आहे. 10 वर्षातच त्यांनी साखर सम्राट अशी नवी ओळख निर्माण केली.
पंढरपुरात त्यंनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भालके गटाला पराभूत करत 21 पैकी 20 जागा काबीज केल्या होत्या. त्यानंतर ते जास्त प्रकाशझोतात आले होते.
सध्या त्यांच्या ताब्यात 5 साखर कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सह. साखर कारखाना, नाशिक, नांदेड आणि उस्मानाबादेतील धाराशिव येथेही त्यांचा एक साखर कारखाना आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अभिजित पाटील यांच्याविरोधात आयकर विभागाची छापेमारी झाली. यावेळी ते अडचणीत सापडल्याचे दिसत होते.
मात्र चौकशीनंतर अभिजित पाटील यांनी टीव्ही9 लाच मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी माझ्याविरोधातील चौकशीत काही आढळलं नाही, असं म्हटलं होतं.
तसेच विरोधकांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं असून त्यांची नावं वेळीच उघड करीन, असंही त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.
अभिजित पाटील यांच्या चौकशीनंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच पाटील भाजपात येणार अशी चर्चा सुरु झाली होती.