अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी

| Updated on: Sep 02, 2021 | 10:41 PM

विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालकांकडून चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. संचालक युवराज पाटील यांनी भालके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याची अवस्था बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी
भगीरथ भालके
Follow us on

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या वर्षीची शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम आणि कामगारांचे वेतन अद्याप थकीत आहे. याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व संचालक मंडळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालकांकडून चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. संचालक युवराज पाटील यांनी भालके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याची अवस्था बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Pandharpur Vitthal Sahakari Sugar Factory, Demand for resignation of Chairman Bhagirath Bhalke)

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक कारणामुळे विठ्ठल साखर कारखाना डबघाईला आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विठ्ठल कारखान्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कारखान्यातील थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. अजितदादांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याची अशी अवस्था पाहून आता सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ठेकेदारांची बिले थकीत

विठ्ठलाच्या सत्ताधाऱ्यांकडून कारखान्या थकीत बिलासाठी राज्य सरकारकडून अनुदान रूपी रक्कम मंजूर करण्याचं आश्वासन भगीरथ भालके यांनी दिलं असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. तर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे कारखाना चालवण्यात सक्षम नसल्याचा संचालक युवराज पाटील यांनी केला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ठेकेदारांची थकीत बिले कारखान्यांकडून अद्यापही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर वारंवार आंदोलनंही केली आहेत. कारखान्याच्या गेटला कुलूप लावून थकीत बिले द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

आश्वासनाची पूर्ती करण्यात भालके अपयशी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चेअरमन भगीरथ भालके यांनी आठवड्याभरात थकित बिलाचे पैसे देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या पदरी निराशाच पडली आहे. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र 10 दिवस उलटूनही पैसे न दिल्यामुळे संचालक मंडळाकडून आता भालके यांच्याविरोधातच बंड पुकारण्यात आलंय. संचालक मंडळाकडून चेअरमन भालके यांनी कारखान्याचा कारभार झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येतेय. मात्र चेअरमन भगीरथ भालके हे लवकरच दिलेला शब्द पाळणारा असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या :

Maratha Reservation : राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाही, निवेदनावर सही करणं भाजप खासदारानं टाळलं!

मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

Pandharpur Vitthal Sahakari Sugar Factory, Demand for resignation of Chairman Bhagirath Bhalke