मुंबई : गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित नेहरुंना अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात म्हटलं होतं.
जयंत पाटील यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. 1999 मध्ये अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असे जयंत पाटील म्हणाले.
पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच. पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)
संबंधित बातम्या :
शिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद: संजय राऊत
मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही