बीड : 2014 मध्ये भाजपने राज्यात जो अभूतपूर्व विजय मिळवला होता, त्याचे शिल्पकार दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे होते. त्यांनी स्वतः बीडमधून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण काही दिवसातच त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या जागी कन्या डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात आल्या. या निवडणुकीत बीड जिल्ह्याने प्रीतम मुंडेंना भरघोस मतदान दिलंय. या निकालाच्या वातावरणात बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या आहेत. वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत त्यांनी हॅलो बाबा असं म्हणत बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीहून परत येताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बीड जिल्हा त्यांच्या स्वागतासाठी सजला होता, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. त्यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे भगिणींनी वडिलांशिवाय प्रचार केला.
प्रीतम मुंडेंना आघाडी
लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेचीच आघाडी आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. पण परळी शहरातून त्यांना आघाडी मिळू शकली नाही. परळी शहरातून प्रीतम मुंडे एक हजार मतांनी पिछाडीवर होत्या. इतर तालुक्यांमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत.
परळी शहराने कायमच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येतोय. परळी नगरपरिषदेची निवडणूक असो किंवा विधानसभा आणि लोकसभा, परळी शहरात मात्र भाजपला मताधिक्य मिळत नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हाभरात मुसंडी मारलेली असताना परळी शहरातून मात्र पिछाडीवर होते. परळी ग्रामीण भागात मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांचंच वर्चस्व कायम दिसतंय. अजून पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल.
बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांची थेट लढत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रीतम मुंडेंनी जवळपास 30 हजार मतांची आघाडी घेतली होती. देशातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम प्रीतम मुंडे यांच्या नावावर आहे. पण या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. ही लढत किती अटीतटीची झाली हे अंतिम निकालानंतरच स्पष्ट होईल.