मुंबई : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणलं जाणार आहे. तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव जवळपास निश्चित आहे. रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं.
आता पुन्हा दानवे यांचं नाव मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात निश्चित झाल्याने, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून प्रामुख्याने चार नावं या शर्यतीत आहेत. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.
गिरीश महाजन यांची कारकीर्द पाहता त्यांचं नाव आघाडीवर आहे. संघटन बांधणी असो किंवा अन्य पक्षांची तडजोड, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका पाहता महाजन यांचं नाव आघाडीवर आहे.
दुसरीकडे सुभाष देशमुख हे मराठा चेहरा आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळात समावेश न करता त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाऊ शकतं.
तीन महिने दानवेच प्रदेशाध्यक्ष?
दरम्यान, रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री होत असले, तरी त्यांच्याकडेच आणखी तीन महिने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद ठेवा अशी मागणी भाजपमधूनच होत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या जागा पाहता दानवेंची कामगिरी तशी उत्तम आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर दानवेंऐवजी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची चिन्हं आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजप संघटनात्मक काय बदल करतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.