मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं. यानिमित्ताने ठाकरे आणि मुंडे कुटुंबातील राजकारणापलिकडचे नातेसंबंध (Pankaja Munde at Balasaheb Thackeray Memorial) अधोरेखित झाले.
ठाकरे आणि मुंडे कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असताना बीडमधील गोपीनाथगडावर भेट देऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली होती.
‘बाळासाहेब ठाकरे हे भाजप आणि शिवसेना युतीचं श्रद्धास्थान असून त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. केवळ दोन पक्षांच्या नाहीतर दोन परिवारांच्या स्मृती आहेत’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिवसेनेसोबत संबंध ताणले गेले असताना भाजपकडून कोण नेता स्मृतिस्थळी भेट देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी उपस्थिती लावल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला.
‘बाळासाहेब हे मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबातील आदरणीय असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं. व्यक्तिगत पातळीवर आम्हा सर्व कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. बाळासाहेबांना आम्ही मिस करतोय. मात्र ते नसले तरी त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आमच्यातही कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. राजकारणापलिकडे आमचे नाते आहे’ असंही पंकजा मुंडे ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाल्या.
शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण?
पंकजा मुंडे यांना मी बहीण मानतो. एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार? त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं होतं. त्यावेळी सेना आणि भाजप स्वबळावर लढले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं होतं. भाजप नेत्यांनी ठाकरे कुटुंब किंवा संजय राऊत यांची भेट टाळत त्यानंतर स्मृतिस्थळी हजेरी लावल्याचं दिसलं. Pankaja Munde at Balasaheb Thackeray Memorial