औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज (27 जानेवारी) मागे घेतलं. एका लहान मुलाच्या हातून पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला (Pankaja Munde on CM Uddhav Thackeray). संवेदनशील मुख्यमंत्री मराठवाड्याच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतील. सरकार संधीच सोनं करेल. भविष्यात रस्त्यावर उतरु देणार नाही, असं वाटत असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “महाराष्ट्रात एक आगळंवेगळं सरकार आलं आहे. जे कधी सोबत बसत नव्हते ते एकत्र येऊन सरकारमध्ये आले आहेत. पहिल्यांदा ठाकरे घरातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे. एक संवेदनशील मुख्यमंत्री या मागण्या कधीही नाकारु शकणार नाही. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या मागण्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आहे. या सरकारला शुभेच्छा. त्यांनी आमच्या सरकारपेक्षा चांगलं काम करावं आणि लोकांचं मन जिंकावं. हे उपेक्षांचं उपोषण नाही, तर अपेक्षांचं उपोषण आहे. मराठवाड्याला पाण्याचं स्वप्न पडलं आहे. ते स्वप्न या सरकारनं पूर्ण करावं. पाणी मिळालं तर कर्जमाफीची आणि आत्महत्येची गरजच पडणार नाही.”
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं हे उपोषण भाजपनं यशस्वी केलं. हे उपोषण मराठवाड्यासाठी आणि मराठवाड्यातील पाण्यासाठी आहे. मी राजकारणात येण्याआधीपासून पाण्यावर काम करत आहे. त्यामुळे पाणी हा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाड्यात मी समाजसेवक म्हणून काम करणार आहे. आज केलेलं उपोषण तुमच्या बळावर केलं आहे. माझ्या बरोबर उपोषण करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले आहेत. त्यांचेही आभार, असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
“अनेक उद्योग अडचणीत तरुणांना रोजगार कसा मिळणार?”
शेतकऱ्यालाही वाटतं मुलांना शिकवावं. तरुणांना रोजगार हवा आहे. अनेक उद्योगधंदे पाण्याअभावी बंद करण्याचे आदेश येतात. गोपीनाथ मुंडेंनी युतीच्या काळात मराठवाड्यात खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आज कारखाने अडचणीत आले आहेत. उद्योग अडचणीत सापडले आहेत. अशावेळी तरुणांना रोजगार कसा मिळणार? असाही सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या मराठवाड्यातील लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी कुठंही बाहेर जाण्याची वेळ येऊ नये. गावाकडेच त्यांना रोजगार मिळावा, अशी माझी साधी भावना आहे. आज या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे. स्वतः विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या उपोषणाला पाठिंबा देऊन गेले. कृष्णाचं पाणी, मराठवाड्याचा सिंचन अनुशेष भरुन काढणे असे अनेक प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात एक कॅबिनेट बैठक घ्यावी.”
कार्यकर्ते विरोधात असताना खूप चांगलं वागतात. त्यामुळे विरोधातच राहावं का असा प्रश्न पडतो, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचीही फिरकी घेतली. अखेर पंकजा मुंडे यांनी लहान मुलीच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडलं.
व्हिडीओ :