पराभव नम्रपणे स्वीकारते, हा निकाल त्यांनाही (धनंजय मुंडे) अनाकलनीय : पंकजा मुंडे

| Updated on: Oct 24, 2019 | 1:52 PM

हा पराभव मलाच नव्हे, तर ज्यांचा विजय झालाय त्यांनाही अनाकलनीय आहे, असंही पंकजा मुंडे (Pankaja Munde defeat) म्हणाल्या.

पराभव नम्रपणे स्वीकारते, हा निकाल त्यांनाही (धनंजय मुंडे) अनाकलनीय : पंकजा मुंडे
Follow us on

बीड : पंकजा मुंडे यांनी परळीत पराभव स्वीकारला आहे. जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत असून यापुढे जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम काम करत राहिन, असंही पंकजा मुंडे (Pankaja Munde defeat) म्हणाल्या. मतदारसंघात चांगलं वातावरण होतं, विजयाची खात्री होती, पण हा पराभव मलाच नव्हे, तर ज्यांचा विजय झालाय त्यांनाही अनाकलनीय आहे, असंही पंकजा मुंडे (Pankaja Munde defeat) म्हणाल्या. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी परळीत पंकजा मुंडेंवर मात केली.

परळीत धनंजय मुंडेंच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर आघाडी घेतली आणि ही आघाडी वाढतच गेली. जनतेचा कौल स्वीकारत असून याचा अभ्यास केला जाईल, बीडच्या विकासाचं राजकारण लक्षात आलं आहे, अशी सूचक प्रतिक्रियाही पंकजा मुंडे यांनी दिली.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पराभव खांद्यावर घ्यायला शिकवलं आहे. आम्ही कायम संघर्ष केलाय. पाच वर्ष सत्तेत असूनही एक क्षणही सत्तेत असल्यासारखा वाटला नाही. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, यापुढेही जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम काम करत राहिन, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं

बीडमध्ये देखील भाजपने आपलं खातं उघडलं आहे. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा यांनी विजय मिळवत भाजपचं बीडमधील खातं उघडलं आहे.

बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चर्चेत होती. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढली. त्यांनी केजमधून विजय मिळवला आहे.