मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Vanjari Arakshan) यांनी पहिल्यांदाच वंजारी समाजाच्या वाढीव आरक्षणाच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. वंजारी समाज आरक्षणावर (Pankaja Munde Vanjari Arakshan) योग्य वेळी योग्य पद्धतीने लक्ष घालेन. आरक्षणासाठी मुंडे साहेबांनीही समाजाला रस्त्यावर येऊ दिलं नाही आणि मीही येऊ देणार नाही. हा घाईत घेण्याचा निर्णय नाही, अभ्यासपूर्ण आरक्षण मीच मिळवून देईल, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तरं देताना त्या बोलत होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून वंजारी समाजाकडून वाढीव आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. पण यावर पंकजा मुंडे यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, यावर एवढ्या उशिरा प्रतिक्रिया का? असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “अजून यावर कुणीही प्रश्न विचारला नव्हता. आज प्रश्न विचारलाच आहे, तर यात लक्ष घातलेलं आहे आणि अभ्यास करुन भाष्य केलं जाईल”.
वाढीव आरक्षणासाठी सुरु झालेल्या मोर्चांच्या टायमिंगवरही पंकजा मुंडे यांनी संशय व्यक्त केला. माझ्या समाजाने लाठ्याकाठ्या खाव्या आणि ते तुरुंगात जावे यासाठी तर हे कुणाचं षडयंत्र नाही ना हेही मी पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या. कारण, यावर अजून कोणत्याही वंजारी नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. आई म्हणून मी माझ्या समाजाकडे पाहते आणि काळजीपूर्वक त्यामध्ये लक्ष घालणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
आरक्षणासाठी मुंडे साहेबांनीही समाजाला रस्त्यावर येऊ दिलं नाही आणि मीही येऊ देणार नाही. हा घाईत घेण्याचा निर्णय नाही, अभ्यासपूर्ण आरक्षण मीच मिळवून देईल. यामध्ये कायदेशीर बाबी पाहाव्या लागतात आणि एक अभ्यास गट यासाठी स्थापन केला आहे, अशी माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली.
वंजारी समाजाची नेमकी मागणी काय?
राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसीमधून काढून एनटीमध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी दहा टक्के आरक्षण अटीला होते. पण एनटीमध्ये अ,ब,क आणि ड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळायला लागल्या.
जिथे 100 जागा असतील, तिथे केवळ दोन जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागत आहे. त्यामुळेच आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, तसं न झाल्यास पुन्हा ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी करत वंजारी समाजाने राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे.