मुंबई : पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्या सोमवारी (27 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतील (Fast of Pankaja Munde for Marathwada). औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे हे उपोषण होईल. या उपोषणासाठी पंकजा मुंडे औरंगाबादकडे रवाना झाल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “सरकारचं महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधणं हे आमचं काम आहे. मराठवाड्याची कन्या म्हणून मी नेहमीच सामाजिक काम केलं आहे. हे उपोषण सरकारवर टीका करण्यासाठी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठवाड्याचे नेते या उपोषणाकडे सकारात्मक दृष्टीने बघतील.”
मी 5 वर्षे सरकारमध्ये असताना दुष्काळ निर्मूलनासाठी भरपूर प्रयत्न केले. कृष्णाखोरेचं पाणी मराठवाड्यात आणावं यासाठी आम्ही सर्वात जास्त बजट दिलं आहे. ते काम जलद गतीने झालं तर मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
“सरकारवर आक्षेप नाही, तर अपेक्षा आहेत”
पंकजा मुंडे म्हणाल्या, “पाच वर्ष युतीचं सरकार होतं, मात्र हे प्रश्न मार्गी का लागले नाही हा प्रश्नच नाहीये. पाच वर्षे आम्ही जलदगतीने आर्थिक तरतूद केली. या सरकारने सुद्धा त्याच गतीने काम करावं. यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे. सरकारवर आक्षेप नाही, तर अपेक्षा आहेत. कुणावर नाराजीचा प्रश्न नाही, हा संवेदनशील प्रश्न आहे.”
“मुख्यमंत्रीनी मराठवाड्यात कॅबिनेट घ्यावी”
पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेण्याची मागणी केली. या बैठकीमुळे मराठवाड्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. सरकारच्या दोन्ही योजनांना माझ्या शुभेच्छा. एवढ्यात सरकारवर टीका करणार नाही. पुढील काळात अडचणी दिसतील. या अडचणी दिसू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल, असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
पंकजा मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफ योजनेबद्दल भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “नाईट लाईफ योजनेमुळे तयार होणारा सुरक्षा यंत्रणांवरील ताण व्यवस्थित हँडल केला, तर माझ्या दुष्टीने या योजनेत विरोध नाही. निवासी भागातील त्रासावर आदित्य ठाकरेंनी निर्णय घेऊ असं सांगितलं आहे. सरकारच्या शिवभोजन थाळीला माझ्या शुभेच्छा. जमलं तर खायला जाईन.”