बीडः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज अर्धा तासाचं मौन धारण केलंय. स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज बीडमध्ये गोपीनाथ गडावर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी अर्धा तास मौन धारण केलं. यामागील नेमकी भूमिका काय, हे सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याच्या राजकारणात सध्या ज्या अप्रिय घटना घडतायत, त्यांच्या निषेधार्थ मी मौन धारण करत आहे.
आज राजकारणात महापुरुषांबद्दल काही वक्तव्य होतात. काही जाणीवपूर्वक होतात किंवा काही अनावधानाने होतात. त्या वक्तव्यांचं कुठेतरी राजकारण होतंय, ते योग्य नाही, याच गोष्टीचा मी निषेध करणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
या सगळ्या गोष्टी राजकारणाची पातळी सोडणारं ठरतंय. माझं राजकारणाचं वय 16-17 वर्ष आहे. त्यामुळे मला जे संस्कार मिळाले, त्याच्या विपरीत समाजात काहीतरी घडतंय. तरुण पिढीनी यावर चिंतन केलं पाहिजे, म्हणून मौन हे साधन आहे, ते आम्ही करतोय..
मंत्री चंद्रकांत पाटील जे बोलले, त्याचं मी समर्थन करणार नाही. त्यांनीही त्यावर माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक झाली. त्याबद्दल मी निंदा व्यक्त करते. त्यांचं वय पाहता, डोळ्यात शाई गेली असती, इजा झाली असती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. क्षमा मागितल्यानंतरही व्यक्तीचा अवमान केला.
शरद पवार हे मुंडे साहेबांपेक्षा एक दशक ज्येष्ठ आहेत. त्यांचं नातं विरोधाचं होतं… काही महत्त्वाच्या विषयांवर ज्यावर दोघांनी एकत्र येऊन काम केलंय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देते, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही एवढ्या वर्षांपासून लोक एवढ्या श्रद्धेने हा दिवस साजरा करतात. त्यामुळे त्यांना जे हवं होतं, ते आपण जगलो, हे पाहून खूप आनंद होतो. हीच साहेबांसाठी मोठी भेट आहे, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.