अहमदनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) तसेच भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलल्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत पोहोचले आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Pankaja Munde Pritam Munde supporter Ahmednagar Pathardi Panchayat Samiti chairperson Sunita Daunt resign from his post)
केंद्रीय पातळीवर मुंडे भगिनींना डावलल्याच्या भानवेतून त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीच्या भावनेतून सध्या बीडधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. राजीनाम्याचे हे लोण आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यमान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. दौंड यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. या दोघांनीही आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत. दोघांनीही सोबतच राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
बीडमध्ये सर्वच 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा
मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र याच क्षणी बीडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण 14 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचासुद्धा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली.
इतर बातम्या :
प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाही म्हणून राजीनामे देणारे कार्यकर्ते भाजप निष्ठावान नाहीत : गणेश हाके
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’!, प्रसाद लाड यांचा भाई जगतापांना खोचक टोला
(Pankaja Munde Pritam Munde supporter Ahmednagar Pathardi Panchayat Samiti chairperson Sunita Daunt resign from his post)