नाशिक : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नाशिकच्या व्ही. एन. नाईक या शिक्षण संस्थेत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे सर्व एकाच मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी पंकजा मुंडे आणि शरद पवार हे पहिल्यांदाच एकत्र आल्याने या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती.
पंकजा मुंडेंची शरद पवारांवर स्तुतीसुमनं
“मुंडे साहेब माझे पिता आणि नेताही होते. मी सरकारला त्यांचा पुतळा उभारण्यास कधीच सांगितलं नाही, पण त्यांच्या कामामुळे आज त्यांच्या आठवणीत हा पुतळा उभारण्यात आला”, असे गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी त्या म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडेंनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार असल्याचं पंकजा म्हणाल्या. तसेच ते सर्वोच्च मार्गदशक आहेत, असेही पंकजा यांनी म्हटलं. पवार साहेबांच्य भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असतं. बीडमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. पण विरोध हा व्यक्तीला नाही, तर विचारांना आहे, असे म्हणत पंकजा यांनी पवारांचे कौतुक केले.
पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक
दुसरीकडे पवारांनीही पंकजा आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. “द्रष्ट्या नेत्यांमुळे राज्यात शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात. शिक्षणाचा दर्जा उत्तम असला की, विद्यार्थ्यांची कमतरता नसते. मात्र, अनेकांनी शिक्षण संस्थांच्या नावाने दुकानदारी सुरु केली आहे”, असे शरद पवार म्हणाले.
गोपीनथ मुंडे यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले, “संघर्ष करायचा तर संघर्षच करायचा आणि दोस्ती करायची तर जीव पण द्यायचा. गोपीनाथ मुंडे असेच होते. ज्या माणसाला आपण जवळून बघितलं असतं, त्याचा पुतळा बघणे कठिण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यामुळे अनेकांना संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. लहानसहान गोष्टींवरून टोकाचं भांडण करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा हातखंडा होता. मी आणि गोपीनाथ आमची जन्मतारीख एकच 12 डिसेंबर”, असे म्हणत पवारांनी गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण केलं.
“परळीचं वीज निर्मिती केंद्र बंद झालं, तर एकलग्न नाशिकचं केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे, हे चांगल नाही. सरकारनं जरा गांभीर्यानं घेतलं पाहिजे. ऊसतोड कामगार आणि साखर कारखाने यात मोठा संघर्ष होता. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांची बाजू घेतली, अखेर मुंडे-पवार लवाद सगळ्यांनी मान्य केला यामुळे साखर उद्योगात स्थिरता आली. आता पंकजा आणि जयंतराव पाटील ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत आहेत. महाराष्ट्रात उत्तम चालणारा कारखाना ‘वैद्यनाथ’ हा गोपीनाथ मुंडे यांनी काढला, त्यांनी यात राजकारण कधी आणलं नाही”, असेही पवार म्हणाले.
भुजबळांकडून गोपीनाथ मुंडेंची आठवण
“युती होण्यात गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान होतं. मुंडे साहेब पवारांवर तुटून पडायचे. पण राजकारण झाल्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघेही एकत्र यायचे. राजकारणात गुगली कशी टाकायची हे मुंडे साहेबांना चांगलं माहीत होतं. आम्ही सरळसोट बोलतो. आरक्षण कोणालाही द्या मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका ही माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. मात्र, अजूनही ओबीसी जनगणना झाली नाही याची मला खंत आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे प्रेमाचे संबंध– आव्हाड
आव्हाड यांनी शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्या मोठेपणाचे विविध किस्से सांगितले. आव्हाड म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे प्रेमाचे संबंध होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी त्यांनी माझ्यावरील प्रेम कमी केले नाही. तोच धागा आजही जोडलेला आहे. पंकजाताई आणि माझे फार जवळचे संबंध नाहीत. मात्र, कधीही गेलो तरी एक, दीड कोटी रूपये मिळतील अशा कागदावर त्या केव्हाही सही करतात,” असे आव्हाड म्हणाले.
आव्हाडांचे हे वक्तव्य ऐकून पंकजांना हसू आवरले नाही, तर शरद पवारांनी लगेच सहीसाठी रायटिंग पॅड पंकजा यांच्या पुढे केला. हे बघून उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.