मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशी आपली इच्छा असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde on Eknath Khadse) म्हणाल्या. खडसेंवर अन्याय झाला का? या प्रश्नाला मात्र पंकजा मुंडेंनी बगल दिली.
“एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा देते, खडसे मंत्रिमंडळात असावेत, अशी माझी इच्छाही आहे” असं पंकजा मुंडे (Pankaja Munde on Eknath Khadse) यांनी ‘बीबीसी मराठी’ला सांगितलं.
खडसेंवर अन्याय झालाय का, या प्रश्नाला मात्र पंकजा मुंडेंनी बगल दिली. “नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं.” असं पंकजा (Pankaja Munde on Eknath Khadse) म्हणाल्या.
2014 मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सरकार सत्तेत निवडून आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे महसूलमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच एकनाथ खडसे यांच्यावर कथित जमिन व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात त्यांना क्लीन चीटही मिळाली होती. मात्र खडसेंची वर्णी मंत्रिमंडळात लागली नाही.
धनंजय मुंडेंना उत्तर
पंकजा मुंडे सहानुभूतीच्या नावाखाली मतं मागतात, हा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप पंकजा मुंडेंनी उडवून लावला. “एखाद्या मुलीचे वडील वारल्यानंतर तिनं काय हसत, ढोलताशे वाजवत मैदानात उतरायचं का? आठवण आल्यावर दोन शब्द बोलायचे नाही का?” असा सवाल पंकजा मुंडेंनी विचारला.
“सहानुभूती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जनतेची सहानुभूती आहेच. सहानुभूती त्यांनाच मिळते ज्यांचे जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात.” असा टोलाही पंकजा मुंडेंना लगावला.
परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांनाच पुन्हा भाजपकडून तिकीट मिळणं निश्चित आहे. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा भाऊ-बहिणीमध्ये रंगतदार सामना होणार आहे.
“धनंजय मुंडेंच्या कुठल्याच विधानाला मी गांभीर्याने घेतलं नाही. आरोप करणं हा त्यांचा अजेंडा एकच होता, तो त्यांनी पाच वर्ष चांगला निभावला. धनंजय मुंडे यांचंही भाषण मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मुंडेसाहेब जिवंत असताना धनंजय मुंडे आग ओकत असत.” असंही त्या पुढे म्हणाल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा
निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.