बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्यावर सध्या बीड जिल्हा परिषदेत भाजपचा गड राखण्याची मोठी जबाबदारी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019) दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र आहे. मात्र, पंकजा मुंडे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उभारी घेताना दिसत आहेत. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे पंकजा मुंडे जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा दमदार एन्ट्री घेण्यात यशस्वी होणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्हा परिषद
बीड जिल्हा परिषदेत एकूण 59 जागा आहेत. सध्या जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना यांची सत्ता आहे. म्हणजेच जिल्हा परिषद पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. भाजप 23 जागा, शिवसेना चार जागा, आडसकर गटाची एक जागा अशा 28 जागा भाजपच्या गोटात आहेत. यात तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांच्या गोटातील पाच उमेदवारांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचा झेंडा रोवला गेला होता. सध्या या पाच जागा अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत, तर दोन जागांच्या उमेदवारांनी राजीनामा दिला. आता शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली, तर सर्वात मोठा झटका भाजपला म्हणजे पंकजा मुंडे यांना बसणार आहे. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून एक हाती सत्ता जिल्हा परिषदेवर राहील.
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव
2014 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांनी राज्याची धुरा सांभाळली होती. त्याच पद्धतीने राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता खेचून आणण्यात त्यांना यश मिळालं. मात्र, पाच वर्षानंतर त्यांचा हा संघर्ष वारसा कामी आला नाही. 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला, इतक्यात सत्ताही हातातून गेली. आज घडीला पंकजा मुंडे ह्या एकट्या आहेत. सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेतृत्व पुनर्वसन होणार अशी चर्चा होती. मात्र, हाती आलेली सत्ता गेली आणि पुनर्वसन तसेच रेंगाळत राहिलं. राज्याच समीकरण काहीही असलं, तरी बीड जिल्हा परिषदेवर सत्ता ही भाजपचीच राहील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता. मात्र, सध्याचे राजकीय बलाबल पाहता शिवसेना राष्ट्रवादीसोबत असल्याने बीड जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपला साथ देईल का, यावर मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांच्यावर अनेक वर्ग नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांना पराभव जरी मान्य नसेल, तरी सर्वसामन्यांचा मात्र त्यांना विरोध होता. याचा अर्थ पंकजा मुंडे यांना पक्षांनी नव्हे, तर जनतेने नाकारल असंच होतं. जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षांची जागा खुल्या प्रवर्गातील महिलांना होती. मात्र, पंकजा मुंडे यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी चक्क खुल्या प्रवर्गातील महिलांना डावलत ओबीसी प्रवर्गातील म्हणजेच वंजारी समाजाच्या हाती नेतृत्व दिलं. यामुळेच मराठा समाजात मोठी नाराजी पाहायला मिळाली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना त्याच नाराजीला सामोरे जावं लागलं. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ओबीसी प्रवर्गातून महिलांना संधी देण्यात आली. अशात चार ओबीसी महिला सदस्य आहेत.
यात सर्वात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे बीड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक अशोक थोरात यांची भावजय योगिनी थोरात यांचं. यानंतर दुसरं नाव येते ते म्हणजे सारिका डोईफोडे यांचं, मात्र आता पंकजा मुंडे कोणाला अध्यक्ष करतील याकडे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना खरी साथ मिळाली ती शिवसेनेची आणि याच शिवसेनेच्या चार सदस्यांच्या बळावर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. मात्र, सध्या शिवसेनेचा भाजपशी काडीमोड झाल्यानं शिवसेनेचे सदस्य पंकजा मुंडेंना खरंच मदत करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Pankja Munde And Beed ZP Elections