संभाजी मुंडे, परळी : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं त्यांच्या मूळ गावी काल संध्याकाळी जंगी स्वागत करण्यात आलं. तालुक्यातील काही विकासकामांच्या शुभारंभासाठी पंकजा मुंडे परळीत आल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पंकजा मुंडे यांच्या कारच्या दोन्ही बाजूंनी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही झाली. या पुष्पवृष्टीमुळे पंकजा मुंडे यांची गाडी फुलांच्या पाकळ्यांनी झाकली गेली. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून पंकजा मुंडेही भारावून गेल्या.
परळी तालुक्यातील बेलंबा गावामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याकडून पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी १० क्विंटल फुलांचा हार पंकजा मुंडे यांना घालण्यात आला. तसेच जीसीबीच्या साह्याने पंकजा मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजीदेखील करण्यात आली. कौठाळी गावच्या जलजीवन विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला यावेळी पुष्पवृष्टी करून वाजत गाजत पंकजा मुंडे यांची रॅली काढून गावकऱ्यांनी स्वागत केलं.
पंकजा मुंडे यांनी या विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी जोरदार भाषण केलं. समर्थकांनी एवढं प्रेम दिलं, त्याबद्दल आभार मानले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी आणलेल्या विकास कामाचा शुभारंभ सुद्धा विरोधी पक्षाचे लोक करत आहेत. मी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणार नाही पण खोटं आश्वासने देऊन पुढची पिढी बिघडवणारा नेत्याला तुमच्या जवळ येऊ देणार नाही.. खोटं कोण बोलतात लोकांमध्ये दहशत कोण पसरवतात.. आणि कोण व्हिलन आहे,हे तुम्हाला चांगलं माहित आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.
मा.@Pankajamunde ताई परळीहून कौठळी कडे कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यात बेलंबा येथे ग्रामस्थ व युवा कार्यकर्त्यांनी ताईंचे जोरदार असे उत्स्फूर्त स्वागत केले. #परळी #उस्फुर्त_स्वागत pic.twitter.com/eNFyucGxAf
— Pankaja Munde’s Office (@pmo_munde) March 3, 2023
भाषणात पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या, ‘ मुंडे साहेबांना जाऊन आता नऊ वर्ष पूर्ण झाले. तरी तुम्ही परळी ही मुंडे साहेबाची असंच म्हणतात. कुणीही त्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्यांची परळी कधीच होऊ शकत नाही, असा घणाघाती आरोप पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा नाव न घेता केला. परळी विधानसभा मतदारसंघातील कौठाळी या गावी जाहीर सभेत त्या बोलत होत्या.