परभणीः शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जात आहेत. परभणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी खासदार सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांचा शिवसेना प्रवेश झाल्याची चर्चा आहे. सुरेश जाधव यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मागील आठवड्यात परभणीचे शिवसेना खासदार संजय ( बंडु) जाधव हे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. संजय जाधव यांनी आपण उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असून शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक आमदार खासदार शिंदे यांच्या समर्थनार्थ गेले. मात्र परभणीतून एकनाथ शिंदे यांना पाहिजे तसा प्रतिसाद आतापर्यंत मिळाला नाही. बोटावर मोजण्याइतके एक-दोन कार्यकर्ते शिंदे गटात गेले खरे, मात्र आमदार खासदार मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्याने शिवसेनेला फारसा तोटा परभणीत सहन करावा लागला नाही. त्यामुळे शिंदे गटाचे हात परभणीत जवळपास रिकामेच राहिले. मात्र शिवसेनेचे दोन टर्मचे खासदार आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले सुरेश जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यात त्यांनी खाजगी कारणास्तव पक्ष सोडत असल्याचा खुलासा केला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठीच जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलंय. त्यामुळे परभणीत एक-दोन कार्यकर्ते शिंदे यांच्या गटात गेले होते, मात्र आता जाधव यांच्या रूपाने माजी खासदार आणि राष्ट्रवादीचा प्रदेश उपाध्यक्ष शिंदे यांच्या गळाला परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाय रोवल्याची चर्चा आहे
परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. नद्यांच्या पुराचं पाणी शेतात गेल्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.