बीड : नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा करण्यात आल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील परळीत समोर आलाय. एरवी नागरिक आपल्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे जातात. पण इथे लोकप्रतिनिधीच्याच जागेवर कब्जा केल्याचा आरोप केला जातोय. आपल्या जागेवर कब्जा केल्याने नगराध्यक्षा सरोजनी हलगी यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केलंय.
परळी बसस्थानक परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हलगे यांच्या सासरच्या नावे 12 एकर जमीन होती. पावणेदोन एकर बाजूला ठेवून त्यांनी ती सर्व जमीन विकून टाकली. मात्र बुधवारी सायंकाळी अचानक हलगी यांच्या पावणेदोन एकर जागेवर मार्कआउट करण्यात आलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी लेआउटही पाडण्यात आले.
सदर बाब नगराध्यक्षांच्या कानावर पडली आणि नगराध्यक्षांचे संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहोचलं. नगराध्यक्षांच्या जागेवर कब्जा झाल्याने ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. पाहता पाहता संपूर्ण शहर घटनास्थळी पोहोचलं. कब्जा हटविण्यात यावा यासाठी नगराध्यक्ष सरोजनी हलगे आणि त्यांचे पती सोमनाथ आप्पा यांनी आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत संबंधित कब्जा करणाऱ्या आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा नगराध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबाने घेतलाय.
नगराध्यक्षांच्या पतीकडून पोलिसात तक्रार दाखल
नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा घालण्यात आल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा परळी निर्माण झालाय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मातब्बर नेते परळीचे प्रतिनिधित्व करतात. परळी मतदारसंघात दिवसाढवळ्या चक्क नगराध्यक्षांच्या जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आलाय. या प्रकरणी नगराध्यक्षांचे पती सोमनाथ आप्पा हलगी यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शहरातील रवी टाक यांनी हा कब्जा केल्याचा हलगे कुटुंबाचा आरोप आहे. या प्रकरणी रवी टाक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास साफ नकार दिला. रवी टाक हे परळीतील रहिवासी आहेत. प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. अनेकांना प्लॉटिंगमध्ये फसवल्याचा त्यांचे वडील अरुण टाक यांच्यावर आरोप आहेत. शिवाय 20 पेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यावेळी थेट नगराध्यक्षाचीच जागा बळकावल्याने आता रवी टाक यांच्यावर काय कारवाई होते त्याकडे परळीकरांचं लक्ष लागलंय.