मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काल पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करुन लढणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा येतात. त्यातील 10 जागा काल, तर 5 जागा जाहीर करण्यात आल्या. विशेष म्हणजे, मावळमधून नातू पार्थ पवार यांची उमेदवारी स्वत: शरद पवार यांनीच जाहीर केली. तसेच, दुसऱ्या यादीतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमधून विलास लांडे यांचा पत्ता कट झाला आहे.
शरद पवार यांची तिसरी पिढी म्हणजे पार्थ पवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चिती मानली जात होती. पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर पत्रकाद्वारे संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे, वडील अजित पवार आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळत असल्याचा आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलंय.